महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही - बबनराव लोणीकर शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०१९

शिर्डी : राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध लोककल्याणकारी योजना  राबवित आहे. याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.

राहूरी तालुक्यातील ब्राम्हणी व अन्य चार गावांसाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजे 32 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आज ब्राम्हणी येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषद सदस्य ॲड.सुभाष पाटील, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता एस.जी.कालिके, कार्यकारी अभियता बी.एस.अहिरे यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.लोणीकर म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राहूरी परिसरातील व जवळपासच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 69 कोटी रुपयांच्या योजनांनासुद्धा लवकरच मंजूरी मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये 667 कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून यासाठी आवश्यक अनुदान मंजूर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांना शासन निधी कमी पडू देणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी, शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत उंबरे,ता.राहूरी येथील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचेहस्ते झाले. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, संबधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा