महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर राजकीय जाहिरातीसाठी एमसीएमसीचे प्रमाणपत्र बंधनकारक- डॉ. अभिजीत चौधरी गुरुवार, १४ मार्च, २०१९सांगली :
बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही, केबल, चॅनेल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्लेज यासह सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण आणि पेड न्यूजवर ही समिती नजर ठेवणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या ३ दिवस आधी समितीकडे अर्ज करावा. तसेच, इतर व्यक्ती किंवा नोंदणी न केलेल्या राजकीय पक्षाच्या बाबतीत जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी ७ दिवस आधी समितीकडे अर्ज करावा, असे त्यांनी सांगितले.

विहित नमुन्यातील अर्जासह प्रचार मजकुराची दोन प्रतीत साक्षांकित संहिता (स्क्रिप्ट), प्रचार मजकुराच्या दोन सीडी द्याव्यात. सीडी, प्रचार साहित्य निर्मिती कर्ता व प्रकाशकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, दिनांक सीडीमध्ये तसेच संहितेमध्ये असावे. सीडीमध्ये जुने चित्रीकरण वापरले असल्यास त्यावर संग्रहीत लिहीणे बंधनकारक आहे. अर्जामध्ये जाहिरात निर्मितीचा व प्रसारणाचा अंदाजित खर्च, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या, केबल, रेडिओ, सोशल मीडिया यावर करावयाच्या प्रक्षेपणासंबंधीतील तपशील, जाहिरात उमेदवाराच्या लाभासाठी करण्यात येत आहे किंवा राजकीय पक्षाच्या लाभासाठी करण्यात येत आहे, याबाबत सत्यापन, जर याप्रमाणे नसल्यास तशा आशयाचे प्रतिज्ञापन, सर्व प्रदाने धनादेश किंवा धनाकर्षने दिली जातील, याचे सत्यापन अर्जासोबत सादर करावे लागेल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा