महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हो आता खेळतोय महाराष्ट्र... शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९


पुणे : “खेळेल महाराष्ट्र तर जिंकेल राष्ट्र” ही थीम घेऊन सुरू असणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेचा ज्वर आता चढायला सुरूवात झाली आहे. खेलो इंडिया स्पर्धा पाहण्यासाठी रोज हजारोंच्या संख्येत येणारे विद्यार्थी या निमित्त उभारण्यात आलेल्या खेलोत्सव एक्स्पोत मित्र-मैत्रीणींसह शिक्षक आणि पालकांच्या सोबत विविध खेळांचा आनंद लुटत आहेत. खेलो इंडियाच्या निमित्ताने “हो आता खेळतोय महाराष्ट्र”... असेच सकारात्मक चित्र दिसत आहे.

युवकांच्यात खेळाची संस्कृती रुजावी आणि खेळाकडे पाहण्याचा शिक्षकांचा आणि पालकांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी गेल्या दोन वर्षापासून देशपातळीवर खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून देशाला नवीन ऑलंपिक पदक विजेते गवसतीलच, मात्र नवी क्रीडा संस्कृतीही रूजणार आहे.

खेलो इंडिया स्पर्धा पाहण्यासाठी आलेले विविध शाळांचे विद्यार्थी खेलोत्सवाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या खेळांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तिरंदाजी, नेमबाजी, वॉल क्लायंबींगसारख्या जरा वेगळ्या खेळांची माहिती घेत तेथेही आपले कौशल्य आजमावत आहेत. नेहमी अभ्यासासाठी मागे लागलेले पालक आणि शिक्षकही खेलो इंडियातील वातावरणामुळे आता मुलांना खेळायला प्रोत्साहन देत त्यांच्या सोबत खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.इथं खूप मज्जा येतेय...

खेळोत्सव एक्स्पोत मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या खेळांचा आस्वाद घेतल्यावर एकदम खुश झालेली इयत्ता सातवीत शिकणारी राजश्री गायकवाड एकदमच भारावलेली होती. खेलो इंडियाच्या निमित्ताने नवीन खेळ बघायला आणि खेळायला मिळाले असे सांगताना इथं खूप मज्जा येतेय अशी प्रतिक्रिया तिने दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा