महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मोर्णा स्वच्छता मोहिमेला स्त्री शक्तीचा अभुतपूर्व प्रतिसाद शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, वयोवृध्द नागरिकांनीही केली मोर्णाची स्वच्छता

अकोला :
मागील महिन्यापासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे आज हजारो महिलांनी एकत्र येऊन मोर्णाची स्वच्छता केली. विद्यार्थीनी, महिला तसेच वयोवृध्द महिला यांचा अभुतपूर्व प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला.

महिलांसोबतच पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या पत्नी तथा वाशिमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व त्यांच्या पत्नी नीता खडसे या सर्वांनी मिळून आज मोर्णाची स्वच्छता केली. विशेष म्हणजे अंडर 19 विश्वकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू तथा अकोल्याचा रहिवासी आदित्य ठाकरे हा आपल्या आई-वडिलांसह मोर्णा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून अकोल्याचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाट्याने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या आजच्या सहाव्या टप्प्याच्या मोहिमेसाठी त्यांनी स्त्री शक्तीला मोर्णा स्वच्छतेसाठी आवाहन केले होते, या आवाहनाला तितकाच भरभरुन प्रतिसाद देत मोर्णा काठी आज पाच हजार स्त्रियांनी एकत्र येऊन मोर्णाची स्वच्छता केली.

आज सकाळी 8.00 वाजल्यापासून गीतानगर भागातून वाहणाऱ्या मोर्णा किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीद्वारे काढण्यात आलेला कचरा महिलांनी वाहनांमध्ये भरुन दिला. तसेच नदीपात्रात उतरुन शेकडो लोकांनी सांघिकरित्या कचरा बाहेर काढला. स्वत: पालकमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन श्रमदात्यांना प्रोत्सहित केले.

मोर्णा स्वच्छता मोहिमेला मिळत असलेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे, अशी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले की, मोर्णाच्या स्वच्छतेसाठी हजारोच्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांचा मला अभिमान आहे. एखाद्या लोकाभिमुख कार्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र येणारी ही घटना असून अकोलेकरांसाठी ही गौरवाची बाब आहे.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, मोर्णाच्या स्वच्छतेसाठी मागील महिन्यापासून अकोलेकरांची उत्स्फूर्त साथ मिळत आहे. आज महिलांनी स्वच्छतेसाठी दिलेला प्रतिसाद खरोखरच कौतुकाची बाब आहे. नदी पूर्णत: स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहिम सुरुच राहणार असून दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल.

नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
आदित्य ठाकरेचा मोर्णा काठी सत्कार
अंडर 19 विश्वकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू तथा अकोल्याचा रहिवासी आदित्य ठाकरे व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार आज मोर्णा काठी झाला. महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या पत्नी तथा वाशिमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आदित्य, त्याचे आई-वडील व प्रशिक्षक भरत डिक्कर यांचा सत्कार केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा