महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
घरकुल योजना मोहीमस्तरावर राबवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार, ०८ ऑक्टोंबर, २०१८
जळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून जिल्ह्यातील बेघर नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी घरकूल योजना मोहिम स्तरावर राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियेाजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, संजय सावकारे, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेश पाटील, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, जिल्ह्याला घरकूल योजनेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून जळगाव जिल्ह्याने देशात अग्रेसर राहण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा. अपूर्ण घरकुलांची माहिती घेऊन ते लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यात यावी. शासनाच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजना मिशन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा घेतला. ते म्हणाले, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेल्या 48 योजना मार्च 2019 अखरे पूर्ण कराव्यात. ज्या योजनांमध्ये जास्त गावांचा समावेश आहे अशा पाणी पुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जेच्या वापराचा विचार करण्यात यावा. त्यामुळे खर्च कमी होऊन शाश्वत वीज मिळू शकेल. योजनांची माहिती घेऊन योग्य नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आपल्या विविध योजनांचा सविस्तर डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. धरणगाव पाणीपुरवठा योजना आणि अमृत येाजनेअंतर्गत भुसावळ पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि एरंडोलच्या येाजना सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण कराव्यात, असे निर्देश श्री.फडणवीस यांनी दिले.

पीक परिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीकपेऱ्याची पाहणी करावी आणि वस्तुस्थितीची सातबाऱ्यावर नोंद घ्यावी. हा उपक्रम मिशन म्हणून राबवावा. सुक्ष्म सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेऊनही लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जलयुक्त शिवार योजनेची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा देखील आढावा घेऊन दोन्ही योजनांद्वारे निर्माण झालेल्या जलसाठ्याची त्यांनी माहिती घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि मुद्रा बँक येाजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करण्यात यावा. योजनांचा लाभ घेणाऱ्यांची माहिती सादर करण्यात यावी. डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी वेळीच दूर करण्यात याव्यात.

मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करावीत. ठक्कर बाप्पा योजनेची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावीत. भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई व दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व यंत्रणांना दिले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, स्क्षूम सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत मंजूर झालेले शेळगाव बॅरेज व वरखेडे लोंढे बॅरेज योजनांचा आढावा घेऊन या योजनांची कामे लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकार किशोर राजे निंबाळकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास योजना आणि उपक्रमांची माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा