महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील शिष्यवृत्तीचे सर्व अर्ज निकाली ! -सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८
जळगाव : जिल्ह्यातील सर्व पात्र अर्जदार विद्यार्थींची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली असून रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे दिली.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक अजिंठा विश्रामगृहात श्री. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, खुशाल गायकवाड, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती. अनिता राठोड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, विविध महामंडळाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. कांबळे यांनी विशेष घटक योजने अंतर्गत उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्यासाठी विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिकांना संपर्क साधण्याच्या सूचना संबंधिताना यावेळी दिल्या. विशेष घटक योजनेतंर्गत प्राप्त रक्कम रुपये 15 कोटी निधी वेळेत खर्च करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. या बैठकीत इंदिरा आवास, रमाई घरकुल योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना आदी योजनाचा आढावा घेण्यात आला.

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणारे संत रोहिदास चर्मेकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली. त्यांना देण्यात आले लक्ष्य त्यांनी केलेले लक्ष्यपूर्वीचा आढावा घेतला. याबाबत मार्गदर्शन करताना श्री. कांबळे यांनी महामंडळांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच महामंडळामार्फत राबविऱ्या येत असलेल्या विविध योजनांसाठी असलेल्या अनुदानाची मर्यादा वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.

या बैठकीस सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक गणेश बोरसे, संत रोहिदास चर्मेकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एम. तडवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक तारचंद्र कसबे, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक एस. वी. अडमोल, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे लिपीक आनंद कडेवार, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक श्री. राठोड आणि अपंग विकास महामंडळांच्या सौ. पवार आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा