महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गाव-तांड्यावरच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांची उभारणी - पालकमंत्री बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९


परळी तालुक्यातील लिंबुटा तांडा व सोनहिवरा येथे विविध विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सिरसाळा येथे लाभार्थी महिलांना शिधापत्रिका, आयुष्यमान भारत कार्ड तसेच उज्ज्वला योजनेतून लाभ प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप

बीड :
ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गाव-तांड्यावरच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी महिला बचतगटांची उभारणी करून सक्षम बनवले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज केले.

परळी तालुक्यातील लिंबुटा तांडा येथे सामाजिक सभागृह तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते कामांचा लोकार्पण पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्य गयाबाई कराड, सरपंच सुदाम मुंडे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कराड, बाळासाहेब बनसोडे यासह भीमराव मुंडे राजासाहेब देशमुख शिवाजी गुट्टे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी लिंबुटा ते बहादुरवाडी या ४० लक्ष रुपयांचा रस्ते काम तसेच राज्यमार्ग सोळा ते लिंबुटा तांडा या २५ लक्ष रुपये रस्ते, ११ लक्ष रुपयांच्या शाळा दुरुस्ती काम यासह नाना-नानी पार्क स्मशानभूमी संरक्षक भिंत सामाजिक सभागृह अधिक विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. तसेच त्यांच्या हस्ते २ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन हे करण्यात आले.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, लिंबुटा तांडा हा रस्ता बनविण्यासाठी योजना निश्चित नसल्याने रस्त्याची मंजुरी दिली जात नव्हती. परंतु यासाठी विशेष मंजुरी देताना १ कोटी १६ लक्ष रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे . गाव-तांडे यांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजण्यात येत आहेत. या गावाची लोकसंख्या ८०० पेक्षा कमी असल्याने नियमांचा मर्यादा पाळून हे काम करण्यात आले. याचबरोबर गाव तांड्यावरील लोकांना रोजगार, रस्ते , पिण्याचे पाणी यासह विविध योजनातील विकास पोहचविण्यात येत आहे, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, तांड्यावरील अमेरिकेत जाऊन आलेल्या विमल जाधव यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. तांड्यावरील महिलांनी बनविलेल्या पामडी, गोधडी, उशा अशा अनेक वस्तूंना पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी मागणी असून चांगली किंमत मिळते. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील या महिलांनी बनविलेला मानासाठी पट्टा घालून त्यांचा सत्कार केला आणि तो त्यांनी कार्यक्रमात दीर्घकाळ ठेवला होता, असे महिला व बाल विकास मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पोहरादेवीच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. भविष्यात देखील गाव तांडा यांच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात काम करण्याचे नियोजन केले जात आहे असे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

सोनहिवरा येथे विविध विकास कामांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

परळी तालुक्यातील सोनहिवरा येथे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे, सिमेंट रस्ते व सोनहिवरा ते बोधेगाव या १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या रस्ते कामाचे लोकार्पण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावासाठी करण्यात येणार्‍या ९० लक्ष ३९ हजार रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे आणि महिला ग्राम संघाच्या ५८ लक्ष रुपयांच्या कामासह जलशुद्धीकरण सयंत्र, रस्तेसह विविध कामांचे भूमिपूजन श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी बोलताना राज्याचा ग्रामविकास व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या मागील पाच वर्षात राज्य शासनाने ग्रामविकासासाठी सुंदर रस्ते तयार केले आहे आहेत .यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याबरोबरच २५१५ तील विकास कामे , पशुवैद्यकीय दवाखाने , शाळा, बचत गटांच्या महिलांना निधी आदीतून विकास घडवून आणला आहे .प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून या गावात जवळपास दोन कोटी रुपये इतका निधी भरपाईसाठी दिला गेला आहे असे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागाचा समस्या सोडविण्यासाठी गावांना मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. शासनाच्या योजनांचा वापर करून विकास घडवून आणला जात आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते, पेयजल पाणीपुरवठा योजनातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जात आहे. याचा गावकऱ्यांना नक्कीच फायदा मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीहरी मुंडे, रमेश कराड, राजेश देशमुख आदी मान्यवर शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिरसाळा येथे शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्र व साहित्य वितरीत

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे शासनाच्या विविध योजनातील पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्राचे व साहित्याचे वितरण आज करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर अधिकारी लाभार्थी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर व शेगडीचे वितरण आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना हेल्थकार्डचे वाटप मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लाभार्थी महिलांनी मनोगते व्यक्त केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा