महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल पाठवा- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोमवार, ०४ नोव्हेंबर, २०१९


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी

ठाणे :
जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी तालुका विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

भिवंडी तालुक्यातील महापोली,पालखणे, सुर्यानगर, विश्वगड, झिडके येथील पाहणी केली. अती वृष्टी झालेल्या शेतशिवाराची श्री खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासनास लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले. बाज़ार समिती आवारात शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत बैठक घेउन संवाद साधला आणी शेतकऱ्यांना मदतीच्या दिलासा दिला.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार आहे. नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार शांताराम मोरे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती दीपाली पाटील, विभागीय कृषि सह संचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, पंचायत समिति सभापति श्रीमती ज्योती ठाकरे, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड़ व सर्व तालुक़ा स्तरीय अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा