महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कारासाठी प्रयत्न करु - नितीन गडकरी सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९


नागपूर :
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे आयोजित माळी-मौर्य–सैनी-मरार-कुशवाह–शाक्य अखिल भारतीय माळी समाजाचे महाअधिवेशन कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते. अखिल भारतीय माळी समाजाच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, महापौर श्रीमती नंदा जिचकार, विकास ठाकरे, अरुण पवार तसेच समाजातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली करुन देणारे, सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाज शिक्षणाची कास धरणाऱ्या फुले दाम्पत्यांचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान मोठे असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, समाजाचा विकास हा बदलत्या काळानुसार मूल्याधिष्ठित शिक्षणातून होतो. त्यामुळे पाल्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. माळी समाजाला विकासाची दृष्टी देण्याचे काम या समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाने करण्याची गरज आहे. केवळ लोकसंख्येनुसार प्रतिनिधीत्व मिळून विकास होत नाही. त्यासाठी इच्‍छाशक्ती महत्त्वाची आहे. माळी समाजाने एकसंघ होत, ज्ञान आणि संशोधनांच्या बळावर विकास करावा, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

महापुरुषांचा संबंध जात, धर्म, पंथांशी जोडू नका. फुले दाम्पत्य हे संपूर्ण देशाचे आणि समाजाचे आदर्श आहेत. समाजाच्या प्रगती, विकास आणि विस्तारासाठी संघटन आवश्यक आहे. शिक्षणसंस्थांनी समाजातील शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले पाहिजे. बदलत्या शिक्षण प्रणालीचा विचार करावा. स्वीकार करावा आणि त्यातून नवनव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन आर्थिक प्रगती साधावी. तसेच समाजातील नेतृत्वाने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीचा रोडमॅप तयार करुन तो यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिवेशनाला उपस्थिताना केले.

यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी फुले दाम्पत्य हे समाजापेक्षा खूप मोठे आहेत. हे दाम्पत्य देश आणि सर्व समाजासाठी आदर्श आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच यावेळी समाजाच्या विकास आणि प्रगतीसाठी एकजुट आवश्यक असल्याचे सांगून देशपातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले. यावेळी त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा ही राष्ट्रीय स्मारक बनविण्याच्या मागणीसह इतर सात मागण्या केल्या. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अशोक मानकर, वसंतराव मालधुरे आदींची समायोचित भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा