महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गारपीटग्रस्त मंठा तालुक्यातील गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८
जालना : गारपिटीने नुकसान झालेल्या मंठा तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील नुकसानीची जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नुकत्याच झालेल्या गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या मंठा तालुक्यातील गेवराई, उमरखेड, उस्वद, देवठाणा (उस्वद) या गावांना भेटी देऊन त्या गावात झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीची शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी पाहणी केली. गारपिटीने गहू, ज्वारी, हरभरा या पिकाबरोबरच पपई, केळी, टरबुज या फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनाम्याची प्रक्रिया करुन अहवाल शासनास सादर करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी सांगत शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविम्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतली.

प्रशासनामार्फत पंचनाम्यावेळी नुकसानीचे छायाचित्र काढताना जीपीएस प्रणालीचा वापर करुन त्याचे जिओ टॅगींग करण्याबरोबरच गारपिटीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, मंठ्याचे तहसीलदार राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा