महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
नवी दिल्ली : दौंड - मनमाड या २४७ किमी. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वर्ष २०२१-२२ पर्यंत दुपदरीकरणाचे कार्य पूर्ण करण्यात येणार असून यासाठी अंदाजित २,०८१.२७ कोटी खर्च येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंगळवारी दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास मंजुरी दिली. देशातील रेल्वे गतीमान, विश्वसनीय आणि सुरक्षित होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. या रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासाठी २.०८१.२७ कोटींचा अंदाजित खर्च होणार आहे. वर्ष २०२१-२२ पर्यंत हे काम पूर्ण होणार असून दरवर्षी ५ टक्के दरवाढीनुसार अंदाजित एकूण खर्च २,३३०.५१ कोटी रूपये होणार आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे यात्री आणि माल वाहतुकीच्या कार्यात गती येईल, या मार्गावरील रेल्वे गाड्यांची गर्दीही आटोक्यात आणता येईल. शिर्डी आणि शनि-शिंगणापूर ही धार्मिक स्थळे याच मार्गावर असल्याने भाविकांचीही सोय होईल. दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे या परिसरातील व्यापार उद्योगासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होईल परिणामी या रेल्वे मार्गामुळे या भागातील अर्थकारणालाही गती मिळणार आहे.

पुणे,अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा