महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘लोकराज्यचे वाचन आणि विचारमंथन’ पुढच्या पिढीला नक्कीच घडवेल – आनंद रायते बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
उस्मानाबाद : "लोकराज्य" हे मासिक शासनाचे मुखपत्र असून हे सर्वांगिण मार्गदर्शक आणि उपयुक्त आहे. या मासिकाचे वाचन आणि विचारमंथन पुढच्या पीढीला नक्कीच घडवेल, असा विश्वास उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी आज येथे व्यक्त केला.

"लोकराज्य" मासिक जिल्ह्यात अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचावे त्याचे जास्तीत जास्त वाचक व्हावेत याबाबत जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि औदुंबर उकिरडे यांच्याशी चर्चा करताना ते बोलत होते.

श्री.रायते यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये "लोकराज्य वाचन आणि विचारमंथन" हा उपक्रम २ ऑक्टोबरपासून राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी "लोकराज्य" चे वाचन केल्यानंतर त्या लेखातून त्यांना काय समजले, त्याबद्‌दल त्यांचे मत काय आहे हे मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी संकल्पना त्यांनी मांडली. यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल, त्यांच्या वैचारिक शक्तीत वाढ होईल, लोकराज्यचे सार्वत्रिकीकरण होईल, यातून त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल आणि संपूर्ण प्रक्रियेतून एक सुदृढ लोकशाही, सशक्त समाज घडण्यासाठी पूरक पोषक बौद्धिक वातावरण निर्मिती होईल, यातून संकल्प ते सिद्धी प्रत्यक्षात अवतरेल, असेही ते म्हणाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा