महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ग्रामस्तरावर ग्रीन जीम बसवणार - चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
  • व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत निधी वाटप
  • हर्षल झाडे यांना सर्वोत्कृष्ट रायफलचे वितरण

नागपूर :
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी खेळाचे मैदान असलेल्या ग्रामपंचायतीला 7 लाख खर्चापर्यंत ग्रीन जीम देऊन क्रीडांगण विकासालाही निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

विभागीय क्रीडा संकूल येथे राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूना क्रीडा साहित्यांचे वाटप तसेच क्रीडांगण विकास निधीचे वाटप पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे विजय डांगरे, महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश शहारे, नगरसेविका श्रीमती आभा पांडे, संध्या इंगळे, अविनाश दोसटवार, सचिन सुरेश घोडे, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड उपस्थित होते.

ग्रामीण भागात खेळाडूंना व्यायमासह विविध खेळांमध्ये सहभाग घेता यावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून क्रीडांगण विकास अनुदानअंतर्गत क्रीडांगणाची सुधारणा, सर्वेक्षित भिंत बांधणे, तसेच 200 मीटरचा धाव मार्ग तयार करणे आणि आवश्यक सुविधांसाठी प्रत्येकी 7 लक्ष रुपये अनुदान स्वरुपात देण्यात येत असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ग्रामपंचायतस्तरावर चांगले मैदान असावे तसेच या मैदानावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात असून हा निधी पारदर्शकपणे व ई-निविदा काढूनच खर्च करावा.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 160 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 7 लक्ष रुपयाप्रमाणे क्रीडांगण विकासासाठी निधी देण्यात आला असून 103 व्यायमशाळांसुध्दा आवश्यक खेळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी निधीचे धनादेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले क्रीडा साहित्याचा ग्रामपंचायतस्तरावर गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेताना ग्रामीण भागातही चांगले खेळाडू निर्माण होईल यासाठी क्रीडा साहित्याचा वापर व्हावा अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नामवंत खेळाडू हर्षल झाडे यांना जिल्हा क्रीडा संकूल समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोत्कृष्ट रायफल पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले तसेच कामठी येथील बॉक्सींग प्रशिक्षण केंद्रा 2 लक्ष रुपयाचे बॉक्सींग या खेळाचे साहित्य पकंज नलेंद्रवार यांना देण्यात आले. व्यायमशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायमशाळेचे बांधकाम व व्यायम शाळा साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 7 लक्ष रुपयाच्या अनुदाने धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा