महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सिडकोच्या नवी मुंबई,पनवेल महापालिका क्षेत्रातील कामांबाबत वेगाने कार्यवाहीचे निर्देश मंगळवार, १३ मार्च, २०१८
सिडकोअंतर्गत पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री यांनी घेतली आढावा बैठक

मुंबई :
सिडकोअंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातील भूखंड पुनर्विकास तसेच विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे आढावा बैठक झाली. दोन्ही महापालिकांतर्गत येणाऱ्या सिडकोशी तसेच महसूल, नगरविकास विभागाशी निगडीत बाबींवर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिले.

बैठकीत दोन्ही महापालिकाअंतर्गत येणाऱ्या सिडकोच्या विविध स्वरूपाच्या भूखंडाचे भाडेपट्टे करार नुतनीकरण, डम्पींग ग्राऊंड भूखंडासाठीची कर भरणा यांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. भूखंडांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासह अन्य विकास कामांचा यावेळी आढावाही घेण्यात आला. या सर्व कामांबाबत संबंधित यंत्रणांनी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ एन. रामास्वामी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा