महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विकास कामांचा दोन वर्षांचा आराखडा करा- मिलिंद म्हैसकर शनिवार, १८ मार्च, २०१७
सोलापूर स्मार्ट सिटी संचालक मंडळ बैठकीत सूचना

सोलापूर :
सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध कामांचा येत्या दोन वर्षांचा आराखडा तयार करा, असे निर्देश स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तथा पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले.

सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची सातवी बैठक श्री.म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. बैठकीला महापौर शोभना बनशेट्टी, सभागृह नेते सूर्यकांत पाटील, विरोधी पक्षनेते महेश कोठे, संजय कोळी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आयुक्त विजय काळम-पाटील, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, नगरविकास विभागाचे उपसचिव पी.के. धसमाना, प्रा.नरेंद्र काटीकर, राजशेखर पाटील आणि कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तेली उपस्थित होते.

श्री.म्हैसकर यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या विकास कामांचा येत्या दोन वर्षांचा आराखडा तयार करा. या आराखड्यात समावेश करावयाच्या कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जावेत. या प्रकल्पांचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होईल, त्यांची सोय होईल याकडे लक्ष द्यावे. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असणाऱ्या कामांना संबंधित प्रकल्प व्यवस्थापन कंपनीची तांत्रिक मान्यता असणे आवश्यक आहे. तांत्रिक मान्यतेनंतर संचालक मंडळ प्रशासकीय मान्यता देईल.

बैठकीत पहिल्या टप्प्यात सुरु करावयाच्या 14 विविध कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये स्मार्ट रोड, ई टॉयलेट उभारणी, हुतात्मा गार्डन विकास, कमांड अँड कंट्रोल सेंटर, स्मार्ट किऑस्क, वेब पोर्टल, ओपन जिम, अर्बन गॅलरी, प्रधानमंत्री आवास योजना, सोलर-रुफ टॉप बिल्डींग, नाईट मार्केट, सिद्धेश्वर तलाव विकास आदींचा समावेश आहे. या सर्व विकास कामांसाठी सुमारे 260 कोटी रुपयांचा निधी खर्च होण्याची अपेक्षा आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा