महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे यावे : जिल्हाधिकारी गुरुवार, १४ मार्च, २०१९


महिला दिनाला प्रशासनातर्फे मतदान जनजागृती अभियान

चंद्रपूर :
घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृती मध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी महिला दिनाला केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण अधिकारी आणि तहसील कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता विशेष मतदार नोंदणीचा कार्यक्रम कामगार भवन जिल्हा स्टेडियम जवळ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ते म्हणाले, महिला या अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाकडे बघत असतात. भारतामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी पारदर्शी व सार्वत्रिक सहभागाच्या मतदानाची आवश्यकता आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या वर्षा जामदार उपस्थित होत्या. याशिवाय महिला बालकल्याण समितीच्या सदस्य मनिषा नखाते, पोलीस सहाय्यक निरीक्षक श्रीमती एकरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मतदार जागृती अभियान बाबतची माहिती तहसीलदार रवींद्र माने यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अर्पणा कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रिया पिंपळशेंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बोरीकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी तहसील कार्यालयातर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, पाककलाचे आयोजन केले होते. तसेच याठिकाणी महिलांकरिता ईव्हीएम आणि व्हीव्ही पटची माहिती देखील देण्यात आली. महिलांसाठी मतदार नोंदणी करिता एका विशेष नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती करून अर्ज क्रमांक 6 चे वितरण देखील करण्यात आले. यावेळी काही महिलांच्या नावांची नोंदणी देखील नवमतदार म्हणून करण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साक्षी कार्लेकर, संजय राईंचवार व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा