महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली कृती दल झालेल्या कामाचे मुल्यांकनही करा - विभागीय आयुक्त अनुपकुमार मंगळवार, १८ एप्रिल, २०१७
गडचिरोली : तंबाखुमुक्त गडचिरोली मोहिम राबविताना याचा थेट संबंध मुख कर्करोगाशी आहे याची जाणीव सर्वांना करून दिल्यास प्रभावी काम शक्य आहे आणि केवळ मोहिम राबवून चालणार नाही तर त्याचे योग्य मुल्यांकन केले पाहिजे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.

जिल्हा प्रशासन तसेच सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. याचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज एका बैठकीत घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात हा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक सर्च चे डॉ.अभय बंग, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनु गोयल आदींची प्रमुख उपस्थित होती.

श्री. अनुपकुमार म्हणाले, या कृती दलाची बैठक नियमित स्वरूपात घ्यावी आणि झालेल्या कामातून प्रत्यक्ष काय परिणाम झाला याचे प्रतिबिंब दर्शविणारा अहवाल आगामी बैठकीत सादर करावा. तंबाखुमुक्तीसाठी कार्यालये तसेच शालेयस्तरावर काम झालेले दिसले पाहिजे. तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. या दृष्टीकोणातून जनजागरण करा.

या संदर्भात प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी पूणे येथे यशदा अंतर्गत असणाऱ्या मास्टर ट्रेनरकडे पाठविले जात आहे. आगामी काळात हे प्रशिक्षण गडचिरोली येथेच देण्याचे काम सर्च ने करावे असेही आयुक्तांनी सांगितले.

प्रबोधन / प्रसिद्धी
या कामाला सर्चसोबत टाटा ट्रस्टने मदत देऊ केली आहे. प्रबोधनपर उपक्रम म्हणून सत्यपाल महाराज यांचे कीर्तन चार ठिकाणी आयोजित करण्यात होते. या खेरीज येथे मुक्तीदिनाचा उपक्रम राबविण्यात आला. याला चित्रपट कलाकार मकरंद अनासपुरे यांनी विनाशुल्क वेळ देऊ केला होता, असे डॉ.अभय बंग यांनी सांगितले.

यावेळी सहा जिल्हा आरोग्य अधिकारी-शंभरकर यांनी तर सर्च तर्फे डॉ. मयुर गुप्ता यांनी पॉवर पॉईन्टद्वारे सादरीकरण केले. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते समितीचे सर्व सदस्य आणि सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा