महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण कामे येत्या जून अखेर पूर्ण करावीत - पालक सचिव एकनाथ डवले गुरुवार, ०३ मे, २०१८
नांदेड : जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण कामे येत्या जून अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. डॉ.शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.डवले म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानांतर्गतची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करावीत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे झाली आहेत. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ज्या कामांच्या निविदा तीनवेळा काढूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत लोकसहभागातून कामे घेण्यात यावीत. गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करावा. कंत्राटदारांनी विहीत मुदतीत कामे केली नाहीत तर त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत संबंधित विभागाने जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवावेत. तसेच नाला खोलीकरण, रुंदीकरणाची कामे घेण्यात आली आहेत. त्या नाल्यामध्ये गॅबियन बंधाऱ्याची कामे प्रायोगिक तत्वावर घेण्यात यावीत अशीही सुचना पालक सचिव श्री.डवले यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अंतर्गत मंजूर तरतूद, प्राप्त तरतूद तसेच झालेल्या खर्चाचा आढावाही पालक सचिव श्री.डवले यांनी घेतला. जिल्हाधिकारी श्री.डोंगरे यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा