महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणेतील सुसंवाद, समन्वयाला प्राधान्य देण्याचे आमदार गोऱ्हे यांचे निर्देश सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
औरंगाबाद : लोकप्रतिनिधीद्वारे करण्यात येणाऱ्या जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे काम अधिक प्रभावीरित्या होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील सुसंवाद, समन्वायाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश विधानपरिषद विशेषाधिकार समिती प्रमुख आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीत आमदार तथा समिती प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधिताना निर्देश दिले. यावेळी विधानपरिषद तथा समिती सदस्य रामराव वडकुते, डॉ. सुधीर तांबे यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपायुक्त पोलीस दीपाली घाडगे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे जिल्हा, तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे दोन्ही घटक जनसामांन्याच्या विकासाची कामे करत असतात त्यामुळे त्यांच्यात सातत्यपूर्ण सकारात्मक संवाद असणे महत्त्वाचे आहे. लोकांशी थेट निगडीत असणाऱ्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी विधीमंडळाच्या सभागृहात त्याबाबत प्रश्न विचारुन, लक्षवेधी या आयुधांद्वारे जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत असतात. हा पाठपुरावा अधिक प्रभावी होण्यासाठी संबंधित प्रश्नांची तपशिलवार माहिती, आकडेवारी तत्परतेने लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यावर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन सर्व जिल्हा, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी तत्काळ माहिती द्यावी.

विविध विभागांकडे प्राप्त होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पत्रांना सात दिवसाच्या आत पोच देऊन योग्य ती कार्यवाही दोन महिन्याच्या आत करुन त्याबाबत अहवाल द्यावा. जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देताना लोकप्रतिनिधीद्वारे करण्यात येणाऱ्या सूचनांनूसार तप्तरतेने काम करावे. विशेष अधिकार समितीकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या शून्यावर आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या राजशिष्टाचाराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कटाक्षाने पालन करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मासिक बैठक घेऊन तक्रारींबाबत करण्यात येत असलेल्या कामांबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी, असे निर्देश देऊन डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी आमदार, खासदार निधीतून गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची माहिती, निधीचा विनीयोग यासंदर्भाचा अहवाल महिन्याभरात समितीकडे पाठवावा, महानगरपालिका, नगरपरिषदा याठिकाणी मोठ्या संख्येने महिला लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या असून त्यांना कामकाजाची नियमावली, आपल्या वार्डातील कोणते प्रश्न महानगरपालिकेशी तर कोणते प्रश्न जिल्हा परिषदेशी, विधानसभेशी संबंधित आहे याबाबत माहिती होण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याबाबत, डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले. कार्यालय प्रमुखांनी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांच्या भेटीसाठी योग्य तो वेळ उपलब्ध ठेवावा. कार्यालयातील दूरध्वनीवर शिष्टाचारपुर्णरित्या संवाद साधावा. सर्व शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सेवा विनाखंडीत सुव्यवस्थित सुरू असणे हे कटाक्षाने पहावे. जिल्हाधिकारी यांनी याबाबींची वेळोवेळी तपासणी करावी. यावेळी लोकप्रतिनधींना सन्मानाची, सौजन्याची वागणूक देणे याबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे सादरीकीकरण विभागाचे उपसचिव धनंजय कानेड यांनी केले. तर अवर सचिव उमेश शिंदे यांनी विशेष अधिकाराबाबतचे सादरीकीकरण केले. बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विशेषाधिकार समितीने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करुन जिल्हा आणि तालुकास्तरीय यंत्रणा सकारात्मकतेने लोकप्रतिनिधी सोबत सहकार्यपूर्ण काम करेल, असे सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा