महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डी.पी.डी.सी.च्या सर्व कामांचे व्हिडीओ सादर करा- चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, १२ जुलै, २०१९


बीडीओ,तहसीलदार, कृषी अधिका-यांनी दौरे करा
त्या बॅंकांमधून शासकीय खाती बंद करा

वर्धा :
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेल्या सर्व कामांचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व कामाचे व्हिडीओ सर्व विभागप्रमुखांनी सादर करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देतानाच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील वर्षासाठी डीपीडीसीच्या कामाचे प्रस्ताव २१ जुलैपर्यंत पाठवा. २१ जुलैनंतर कोणाचेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. जो विभागप्रमुख प्रस्ताव देणार नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज २१ विभागाचा आढावा घेतला. बैठकीला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, सर्वश्री आमदार समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, अमर काळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व राजेश बकाने यांची उपस्थिती होती.

जिल्हा नियोजन समितीचा सर्व निधी खर्च झाल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली. डीपीडीसीचा निधी वाटप करताना सर्व तालुक्यांना सारखा निधी वाटप करा. कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही. याची खात्री करा. जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने या सर्वांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. शासनाने विविध कामे करण्यासाठी सात दिवसांच्या निविदांचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

कृषी उत्पादन वाढीसाठी कार्यक्रम तयार करा

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागाने कमी पावसात कोणते पीक घ्यावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्षभराचा कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना दिले. तसेच बीडीओ, तहसीलदार व कृषी अधिकारी यांचा एक गट तयार करुन या तीनही अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व गावात दौरे करुन शेतकऱ्यांच्या सभा घ्या. गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सभा पटवारी यांनी आयोजित कराव्या. प्रत्येक गावातील सभेला १०० ते १५० शेतकरी उपस्थित राहतील असे नियोजन करा. या सभेचे फोटो, व्हिडीओ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभराच्या कार्यक्रमाचे आदेश काढावेत. वर्षभराचा कार्यक्रम लोकप्रतिनिधींना द्या. या पद्धतीने शेतकऱ्यांशी संवाद साधने बंधनकारक असल्याचे निर्देशही श्री. बावनकुळे यांनी दिले.

.. तर त्या बँकामधील खाती बंद करा

शेतकऱ्यांना ज्या बँका कर्ज देत नाहीत, अशा बँकामधील शासकीय खाती बंद करा. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतील, सहकार्य करतात त्या बँकामध्ये शासकीय विभागांनी खाती सुरु करावी, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पीक विम्याबाबत अनेक तक्रारी असून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याकडे खासदार तडस यांनी लक्ष वेधले. पीक विम्याबाबत. कृषी विभागाला बँका सहकार्य करीत नसल्याची माहिती या बैठकीत कृषी अधीक्षक यांनी दिली.

पाच नवीन बोटी घ्या

आपत्ती व्यवस्थापनाकरिता वर्धा जिल्ह्यासाठी पाच नवीन बोटी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नवीन बोटी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घ्या. पावसाळ्यापूर्वी जुन्या बोटी दुरुस्त कराव्यात.

पालकमंत्री पांदन योजनेचे सर्व आराखडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३० जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजूर आराखड्यानुसार पालकमंत्री पांदन योजनेचे काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जलयुक्त शिवारमध्ये लहान नाल्यांचे खोलीकरण करताना गॅबियन बंधारे बांधून पाणी अडवा. तर मोठ्या नद्या व नाले खोलीकरण करण्याचे प्रस्ताव जलसंधारण महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लोकसभागातून जलसंधारणाच्या कामामुळे गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात व शिवारातील पाणी शिवारात मुरते.

जलसंधारण कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती गठित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी राहतील. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी व स्थानिकस्तरचे कार्यकारी अभियंता व जि. प. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता या समितीत राहतील.

यावेळी पालकमंत्र्यांनी अन्न सुरक्षा योजना व धान्य वितरण, उज्वला गॅस योजना, संजय गांधी योजना व इतर योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी वाटप, क्षेत्रीय अधिकारी यांच्या गावभेटी, कामगार कल्याण योजनेचे लाभार्थी नोंदणी-शिबिर लावणे, व्यक्तीगत लाभ योजना, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्यामार्फत राबविण्यात येणारा गावनिहाय कार्यक्रम आखणे, ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा आढावा पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा