महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नगरपालिकांनी नावीन्यपूर्ण प्रकल्पांच्या उभारणीस प्राधान्य द्यावे - दीपक केसरकर सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९


सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजनमधून दिल्या जाणाऱ्या नगरोत्थान निधीतून नगरपालिकांनी नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारावेत, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. कुडाळ एम.आय.डी.सी. येथे आयोजित नगरपालिकांच्या विकास कामांविषयीच्या बैठकीवेळी ते बोलत होते.

रस्ते व गटारी बांधणे या गोष्टी होतच असतात असे सांगून पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, नागरी क्षेत्राचे सुशोभिकरण व नागरिकांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करणे हे नगरपालिकांचे महत्त्वाचे काम आहे. त्यामध्ये खेळाची मैदाने निर्माण करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह, नाट्यगृह, रस्त्यांचे सुभोभिकरण, गार्डन, त्यामध्ये नागरिकांसाठी सुविधा उभारणे ही कामे अपेक्षित आहेत. त्या शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणाही असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नगरपालिकांनी प्रस्ताव तयार करावेत. तसेच नगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे या कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करणारी यंत्रे नगरपालिकांना यंदाच्या वर्षी पूरविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. नगरपालिकांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. त्याचा वापर नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी व्हावा. सर्वांनी एकत्र येऊन नगरांचा विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी केले.

प्रत्येक नगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी निधी देणार

पिण्याचे पाणी हा नगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिकेने पाणी पुरवठा योजना राबवाव्यात व त्यासाठी लागणारा निधी टप्प्याटप्प्याने वितरीत कण्यात येईल. याविषयीचे प्रस्ताव येत्या दोन दिवसात नगर पालिकांनी नियोजन विभागाकडे पाठवावेत अशा सूचना करुन पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले, नियोजन व नगर प्रशासन विभागाने नगर पालिकांकडे याविषयी पाठपुरावा करावा. याशिवाय नगरपालिका क्षेत्रांमध्ये मार्केटची उभारणी करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करावेत. हे प्रस्ताव सादर करताना कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा व त्यानुसार कामाची यादी तयार करुन मगच प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना श्री.केसरकर यांनी यावेळी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा