महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाहतूक करताना पडलेली 'ती' मतदान पेटी पूर्णपणे सुरक्षित शनिवार, २० एप्रिल, २०१९
यवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि. १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या उमरखेड येथून सिलबंद करून नेत असतांना बॅलेट युनीट असलेली एक पेटी खराब रस्त्यामुळे तसेच संरक्षित दोरी तुटल्यामुळे वाहतुकीदरम्यान पडली. ही बाब लगेच लक्षात आल्यावर सदर मतदानपेटी उचलून पूर्णपणे व्यवस्थितरित्या नेण्यात आली. ही पेटी पूर्णपणे सुरक्षित असून यात असलेल्या बॅलेट युनीटचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील कापडनीस यांनी सांगितले.

उमरखेड हा मतदार संघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. काल दि. १८ एप्रिल रोजी या मतदारसंघासाठी मतदान घेण्यात आले. उशिरापर्यंत सर्व मतदान पेट्या उमरखेड येथील मुख्यालयात जमा केल्यानंतर त्या हिंगोलीकडे रवाना करण्यात आल्या. दरम्यान पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे रस्ता अतिशय खराब असल्यामुळे बॅलेट युनीट असलेली एक मतदान पेटी खाली पडली. ही बाब लगेच मागे असलेल्या पोलिस व्हॅनच्या निदर्शनास आली. पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी सदर पेटी उचलून व्यवस्थितपणे बांधून ट्रकमध्ये ठेवली. यात मतपेटीला तसेच यातील बॅलेट युनीटला कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच मतमोजणीमध्ये यात कुठलाही फरक पडणार नाही. त्यामुळे ही मतपेटी व यातील बॅलेट युनीट पूर्णपणे सुरक्षित आहे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा