महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ऑफिसर क्लबची देखणी वास्तू निर्माण झाल्यास लातूरच्या वैभवात भर- संभाजी पाटील निलंगेकर सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९


पालकमंत्र्याच्या हस्ते विधीवत पध्दतीने ऑफिसर्स क्लबचे भूमीपूजन

लातूर :
जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी तसेच लातूर शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स व इतर मान्यवर व्यक्तींसाठी हा ऑफिसर्स क्लब सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या सर्व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जाणार असून क्लबची वास्तू अत्यंत देखणी असून ही निर्माण झाल्यास लातूर शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूच्या परिसरात ऑफिसर्स क्लब बांधकामाच्या भूमीपूजनप्रसंगी श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी आमदार अमित देशमुख, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.निलंगेकर म्हणाले की, अधिकारी एकत्रित येऊन चर्चा विनिमय करणे ही पध्दत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन रचनेपासून अस्तिवात आहे. त्यामुळे लातूर ऑफिसर्स क्लब इमारतीची शैली ही फक्त ब्रिटिशकालीन न ठेवता त्या शैलीत लातूरच्या स्थानिक शैलीचा समावेश करुन अत्यंत दिमाखदार इमारत निर्माण करावी. ही वास्तु लातूर शहराच्या वैभवात नक्कीच भर घालेल. याठिकाणी सर्व अधिकारी तसेच शहरातील मान्यवर व्यक्तींनी एकत्रित येऊन लोकहिताच्या दृष्टीने चर्चा करुन प्रशासनाने त्यातील नव्या कल्पनांच्या नोंदी घेऊन अंमलबजावणी केल्यास विकासाला अधिक गती मिळेल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगून या क्लबमध्ये डॉक्टर्स,इंजिनिअर्स व शहरातील इतर मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

ऑफिसर्स क्लबमध्ये सर्व क्रीडा प्रकारांच्या सुविधा तसेच मनोरंजनाच्या सुविधा मिळणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आलेल्या कामाचा ताण येथे कमी होईल तसेच कामाच्या गुणवत्तेत वाढ होईल, असे आमदार श्री. देशमुख यांनी सांगून या इमारतीच्या कामाबद्दल प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.

ऑफिसर्स क्लबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व अद्यावत क्रीडा सुविधा लातूरकरांसाठी उपलब्ध करुन ‍दिल्या जात आहेत. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना ही कामांचा ताणातून मुक्तता मिळण्यासाठी हा क्लब नक्कीच लाभदायक ठरेल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. त्याप्रमाणेच समाज व शासन एकत्रित येऊन शहराच्या सर्वांगीण विकास घडवून आणला जाईल, असे त्यांनी सांगितले.

या क्लबचे जवळपास 125 मेंबर झाले असून समाजातील जास्तीत जास्त मान्यवर व्यक्तींनी क्ल्बचे सदस्यत्व स्वीकारावे यासाठी लाईफ टाईम मेंबरशीपची रक्कम पाच लाखाहून तीन लाख करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून या क्लबचे काम 10 महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.

प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते व आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ऑफिसर्स क्लब बांधकामाचे भूमीपूजन विधीवत पध्दतीने करण्यात आले. त्यानंतर इमारतीच्या नामफलकाचे अनावरणही झाले. या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार क्लबचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा